पश्चिम बंगालमधील 700 डॉक्टरांचे राजीनामे ; दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

2019 6image 10 02 307334380juniordoctor ll

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. तर पश्चिम बंगालमधील ७०० डॉक्टरांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे.

सहकारी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतरही पश्चिम बंगाल सरकारकडून कोणत्याही कारवाईचे ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत तब्बल 700 सरकारी डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितल्यानंतरच आपण कामावर रूजू होणार असल्याची अट डॉक्टरांकडून घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एम्समधील डॉक्टरांच्या संघटनेनेही ममता बॅनर्जी यांना अल्टीमेटम दिले आहे. दोन दिवसांमध्ये डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास एम्समधील डॉक्टरही अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून आले. तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी आणि फिरहाद हाकिम यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर तोडगा काढावा, असे कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, या आंदोलनामागे भाजप व डावे पक्ष असल्याचा आणि बाहेरचे लोक यात घुसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Protected Content