बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरातील मुख्य रस्त्यावरील अमर हॉटेल समोर भरधाव ट्रकने पायी जाणाऱ्या ७८ वर्षीय वृध्दाला चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. गंगाराम पाटील (वय-७८) रा. बोदवड असे मृत वृध्दाचे नाव आहे. दरम्यान या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण मुळे या वृध्दाचा जीव गेल्याचे बोलले जात असून तातडीने हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड येथील प्रभू ऍग्रोमध्ये काम करीत असलेले सुरेश गंगाराम पाटील यांचे वडील गंगाराम पाटील (वय-७८ ) हे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी शहरातील अमर हॉटेल जवळ नाडगाव कडून मलकापूरला जात असलेल्या ट्रकने गंगाराम पाटील यांना धक्का दिला व ते रोडवर पडले. तेवढ्यात ट्रकने त्यांना चिरडले व जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व पोलीसांनी धाव घेतली. याप्रकरणी बोदवड पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
दरम्यान अशा घटना अनेक वेळेस या ठिकाणी होतात. त्यामुळे अमर हॉटेलचे अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावं याविषयी अनेक वेळा जनसेवक विनोद पाडर यांनी व समाजसेवकांनी बऱ्याच वेळेस लेखी तोंडी नगरपंचायत कडे अर्ज केलेले आहेत. अमर हॉटेलची जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दिलेली होती. त्यामुळे तेथे स्मारक व्हावे यासाठी अनेकदा आंदोलन, मोर्चे, उपोषण व तक्रारी करण्यात आल्या. परंतु बोदवड नगरपंचायत च्या हलगर्जीपणामुळे व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आज परत एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे या गोष्टीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ती जागा खाली करावी. अतिक्रमण मोकळे करावे व त्या ठिकाणी नेहमी एक ट्राफिक हवालदार पोलिसांनी ठेवावा. जेणेकरून अतिक्रमण व ट्राफिक होणार नाही अशी मागणी बोदवडकरांनी नेहमी केलेली आहे व आजही करीत आहे.त्यामुळे निगरगठ्ठ झालेले अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित अतिक्रमण काढावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.