Home क्राईम तलावात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीसात नोंद

तलावात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीसात नोंद


गेल्या आठवड्यापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरूणाचा जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तालावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरूणाचा जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तालावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२२), रा. धामणगाव ता.मोताळा जि.बुलढाणा असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश सुरळकर हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सुरूवातीला नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मयताची ओळख पटून अंकूश सुरळकर असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई कामिनी, वडील शिवाजी दशरथ सुरळकर, मोठा भाऊ निलेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.


Protected Content

Play sound