मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर भाष्य करतांनाच मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पाडून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तरी ते वारंवार शरद पवार यांच्या भेटी घेत असल्याने राजकीय वर्तुख बुचकळ्यात पडले आहे. याच प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपसोबत आले, तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट अजितदादांना थेट पंतप्रधान मोदी यांनी घातली आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
या संदर्भात वडेट्टीवार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, शरद पवार सोबत आले तरच अजितदादांना भाजप मुख्यमंत्री करणार आहे. त्यामुळे अजितदादा वारंवार शरद पवारांची भेट घेऊन त्यांना आमच्यासोबत या अशा दया-याचना करत आहेत. अजित पवारांसोबतच्या भेटीवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार माझे पुतणे आहेत. त्यामुळे केवळ वडीलकीच्या नात्याने त्यांची भेट घेतली. याच काय चुकीचे आहे? तसेच, मी मविआसोबतच व मविआही एकसंघ राहणार आहे. याबाबत कुणीही मनात संभ्रम बाळगू नये, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.