चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील छत्रपती दुध शितकरण केंद्रासमोर असलेल्या गोडावूनवर अन्न व औषध प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने छापा टाकून बेकायदेशीर साठवून ठेवलेला सुगंधित पानमसाला आणि गुटखा असा एकुण २२ लाख ४१ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणात एकाला अटक केली असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील छत्रपती दुध शितकरण केंद्राचे समोर असलेल्या एका गोडावून मध्ये बेकायदेशीरित्या सुगंधित पानमसाला आणि गुटखा यांची साठवणूक केली असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार गुरूवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीसांच्या मदतीने गोडावूनवर छापा टाकला. या कारवाई संशयित आरोपी दत्तु लालदास बैरागी, (वय-२९, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) याला ताब्यात घेतले. या कारवाईत केसरयुक्त विमल पान मसाल्याचे १६ पोते, सुगंधित तंबाखुचे एकुण ११ पोते, केसरयुक्त विमल पानमसाला मोठे पाकीटातील २५ पोते असा एकुण २२ लाख ४१ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा मुद्देमाल संशयित आरोपी हा विक्री करत होता. त्यानुसार संशयित आरोपी दत्तु लालदास बैरागी याच्या विरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह कायफक्त संजय नारागुडे, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, शरद पवार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना पंढरीनाथ पवार, पोना विनोद भोई, पोना दिपक पाटील, पोना तुकाराम चव्हाण, पोकॉ निलेश पाटील, प्रविण जाधव, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, अमोल भोसले, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी व गणेश कुवंर यांनी कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुहास आव्हाड आणि उज्वलकुमार हे करीत आहे.