जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांना अमृत भारत रेल्वे स्टेशनचा दर्जा मिळून येथे अद्ययावत सुविधा मिळणार असून पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा ६ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे.
केंद्र सरकारने देशभरातील निवडक रेल्वे स्थानकांना अमृत भारत रेल्वे स्टेशनचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. यात मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सावदा, रावेर तसेच चाळीसगाव आणि पाचोरा या चार रेल्वे स्थानकांसह अन्य स्थानकांचा यात समावेश आहे.
या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या रेल्वे स्टेशन्सला अतिशय आकर्षक पध्दतीत आणि अद्ययावात सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यात सरकते जिने, प्रशस्त फलाट, प्रवाशांसाठी सुविधा, पार्कींग आदींचा समावेश असेल. यामुळे हे चारे रेल्वे स्टेशन्स लवकरच कात टाकणार असल्याची बाब उघड आहे.
दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून माहिती देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते रविवारी चाळीसगाव स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.