यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथील घरकुल योजना रखडली असल्याने याचे तात्काळ अनुदान मिळावे अशी मागणी रिपाइं आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील मारूळ गावातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या कारभार्यांकडून आर्थिक स्वार्थी वृत्तीमुळे घरकुल अपुर्ण अवस्थेत असल्याने ऐन पावसाळयात उघडयावर राहावे लागत असुन , या सर्व घरकुलच्या लाभार्थ्यांना तात्काळ उर्वरीत अनुदानाचे हप्ते मिळावे अशी मागणी रिपाई (आठवले गटाचे ) मारूळ शाखाप्रमुख राजु रमजान तडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राजु रमजान तडवी यांनी म्हटले आहे की मारूळ तालुका यावल या गावातील घरकुलच्या लाभार्थ्यांना वेळेवर शासनाकडून दिल्या जाणार्या अनुदाना हप्ता मिळत नसल्याने लाभार्थ्यांना आपल्या घरकुलांचे काम अर्धवट व अपुर्ण अवस्थेत असल्याने ऐन पावसाळयात घरकुलच्या सुमारे पन्नास पेक्षा अधिक लाभार्थ्यांना आपल्या लहान मुला बाळांच्या आरोग्यासह अनेक संकटाना तोंड देत उघडयावर संसार करावा लागत आहे.
मारूळ हे गाव सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले गाव असुन अशा परिस्थितीत जंगलातुन येणार्या प्राण्यांचे मोठे संकट या कुटुंबांवर येवु शकते. घरकुल लाभार्थ्यांच्या म्हण्यानुसार पंचायत समितीचे बांधकाम अभियंता हे मारूळ गावाला दोन महीने येत नसल्याने घरकुलच्या लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास विलंब होत असतो. दरम्यान ग्रामपंचायतीचे काही ग्रामपंचायत सदस्य हे ज्या लोकांचे नांव पंचायत समिती देतात त्याच लोकांचे हप्ते मिळतात अशी ही घरकुल लाभार्थ्यांची ओरड आहे. बांधकाम विभागातील अभियंता यांच्याशी संपर्क साधल्यावर ते उडवाउडवी ची उत्तरे देतात , काही ठिकाणी आर्थिक देवाण घेवाण केल्याशिवाय कामे होत नसल्याची ही ग्रामस्थांच्या तक्रार आहेत.
तरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ निर्णय घेवुन घरकुलच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते त्यांच्या खात्यावर टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणी बाबतचे रिपाईच्या मारूळ शाखा अध्यक्ष राजु तडवी यांनी ग्रामस्थ सोबत सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्याकडे निवेदन दिले आहे.