जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तोंडापूरसह परिसरातील शेतकर्यांचे बोगस खतामुळे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई मिळावी यासाठी शेतकर्यांची कृषी केंद्राच्या समोरच अर्धनग्न आंदोलन करून रोष व्यक्त केला.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर, मोयखेडा, मांडव, ढाल सिंगी या गावातील सुमारे १०० च्या वर शेतकर्यांच्या शेतात पिकांना सरदार या ब्रँडची खत दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत. यासाठी शेतकर्यांनी तक्रार केली होती.
याबाबत तोंडापूर येथे कृषी विभागाचे विजय पवार, तहसीलदार नाना आगळे, कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे, पोलीस निरीक्षक सचिन सानप हे तोंडापूर येथे गेले असता यावेळी शेतकर्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. याप्रसंगी संतप्त शेतकर्यांनी दिवसभर अधिकार्यांना अडवून ठेवत आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तोंडापूर येथील दुकानदाराच्या दुकानासमोर अर्धनग्न आंदोलन केले.
या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तहसीलदार यांनी चौकशी करून योग्य ते कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. तथापि, शेतकर्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडत भरपाईची मागणी केल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.