जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलाजनजीक ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. डंपरचालक वाहन सोडूनपसार झाला आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. स्वप्निल सुरेश जोशी (वय-३५) रा. देवीदास कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील देवीदास कॉलनी परिसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई,वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. प्रेम नगरात त्याचे किरणा दुकान होते. मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा तरूण त्याची दुचाकी (एमएच १९ बीएस ४१३) ने इच्छादेवी चौकाकडून देवीदास कॉलनीकडे जाण्यासाठी आकाशवाणी चौकातून जात होता. त्यावेळी गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ५७८८) ने ओव्हरटेक करत असतांना दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्वप्निलच्या डोक्याला डंपरचा फटका बसल्याचे जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर वाहन चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. आकाशवाणी चौकात वाहतूक शाखेचे गस्तीवर असलेले पोहेकॉ हर्षद गवळी आणि चालक दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. रामानंद नगर पोलीसांनी डंपर ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मयत तरूण हा पोलीस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक सुरेश जोशी यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात आई स्मीता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद (वर्ष-४), मुलगी समिक्षा आणि भाऊ असा परिवार आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती..