लोहटार येथील दाम्पत्याचा करूण अंत : परिसरावर शोककळा
पाचोरा-नंदू शेलकर | तालुक्यातील लोहटार येथील वृध्द दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून त्यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय – ७८) यांना सुरुवाती पासूनच अध्यात्माची आवड होती. महामंडळातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (वय – ७२) हे नियमित देवपूजा करुन आजवर अध्यात्मिक मार्गावर चालत होते. मात्र त्यांच्याच बाबतीत अतिशय भयंकर अशी दुर्घटना घडली आहे.
८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिस स्टेशनचा टेलिफोन वाजतो.. समोरुन ईश्वर पाटील बोलतात.. मी व माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणासही कारणीभूत धरु नये. अशी माहिती पोलिस स्टेशनमध्ये देतात. यामुळे पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले असता ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्यांना दिसून आले.
यामुळे पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर वृद्ध दाम्पत्यास वाचविण्यास यश आले होते. मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. आणि उपचार सुरू असतांना १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती अचानक खालावली व काही क्षणातच प्रमिलाबाई पाटील यांचे दुःखद निधन झाले. या घटनेस काही तास उलटत नाही तोच सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांचे देखील दु:खद निधन झाले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.
आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची सापडली चिठ्ठी
तालुक्यातील लोहटार येथील ईश्वर नामदेव पाटील व प्रमिलाबाई ईश्वर पाटील या दाम्पत्यास दोन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. सर्व काही सुरळीत होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील हे दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. इतक्यात काही वेळात तेथे पोलीस दाखल झाले. ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे जवळ एक चिठ्ठी आढळून आली असुन त्या चिठ्ठीत आम्ही दोघेही जीवनास कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहेत. आमच्या मृत्युस कोणासही कारणीभूत धरु नये. अशा आषयाची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
परिसरावर शोककळा
ईश्वर नामदेव पाटील व प्रमिलाबाई ईश्वर पाटील हे साधे आणि सरळमार्गी दाम्पत्य म्हणून ओळखले जात असतांना त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचचले ? याचा उलगडा कुणालाही झालेली नाही. तर त्यांच्या या कृत्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आज अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.