धक्कादायक ! तरूणाचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी येथील तरूणाचा वाघुर धरणाच्या पाटचारीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुरूवार ६ जुलै रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल युवराज भिल (वय २४, रा. रायपूर कंडारी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपुर कुसुंबा येथे मयत राहूल भिल हा वडीलांसोबत वास्तव्याला होता. शेतीमजूरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. रविवारी २ जुलै रोजी काही लोकांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. यामुळे नशिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघुर धरणाच्या पाटचारीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. नशिराबाद आणि एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली असता बेपत्ता झालेला राहूलचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान त्याला गावातील जयराम कोळी याने ठार केले असावा या संशयावरून गावकऱ्यांनी जयराम कोळी याला चोप देत जखमी केले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सोडवले आणि जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तसेच संशयितांची देखील चौकशी सुरू आहे.

Protected Content