जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ४१ वर्षीय महिला रुग्णाला तीव्र हृदयविकारचा झटका येवून हृदयाचे ठोके देखील २५ ते ३० इतके कमी झाले होते, तशाच बेशुद्धवस्थेत व्हेंटीलेटर लावून हृदयविकार तज्ञांद्वारे तातडीने टेम्पररी पेसमेकर एन्जीओप्लास्टी करण्यात आली. अनेक खाजगी इस्पीतळांनी नाकारलेल्या केसला हृदयालयातून जीवनदान मिळाले असून रुग्णाचा पुनर्जन्मच झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वटपौर्णिमेच्या उपवासानंतर प्रकृती बिघडलेल्या ४१ वर्षीय महिला रुग्णावर जळगाव शहरातील खाजगी इस्पीतळात उपचार झाले. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचीही समस्या होती. पाठीतून कळ येत हृदयविकारचा झटका येताच रुग्णाची शुद्ध हरपली. तातडीने खाजगी इस्पीतळात नेले असता गोदावरीच्या डॉ.उल्हास पाटील कार्डियाक सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्ण रुग्णालयात आल्यावर वेळ वाया न घालता परिस्थितीनुसार रुग्णाला तातडीने व्हेंटीलेटर लावून थेट कॅथलॅबमध्ये घेण्यात आले. याप्रसंगी रुग्णाचा बीपीही लागत नव्हता तसेच हृदयाची गती कमी झाली होती. हृदयाचे ठोके २५ ते ३० इतके कमी झाले होते, अगदी कमी वेळ रुग्णाजवळ होता, हृदयालयातील डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील व डॉ.सुमित शेजोळ यांनी रुग्णाला ऑपरेट करत सर्वप्रथम हृदयाचे ठोके वाढण्यासाठी टेम्पररी पेसमेकर टाकण्यात आला. त्यानंतर लगेचच हृदयाला रक्तपुरवठा करणार्या उजव्या बाजूकडील मुख्य रक्तवाहिन्या १०० टक्के बंद असल्याने लगेचच एन्जीओप्लास्टीही करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया रुग्ण व्हेंटीलेटरवर होता त्यावेळी सुरु होती.दरम्यान रुग्णाची शुगर ५०० हून अधिक होती तर बीपी लागत नव्हता तसेच या क्रिटीकल परिस्थीतीमुळे एकेक अवयवावर परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. रक्तातील पी.एच. हा ६.९ एवढा होता. तातडीने शस्त्रक्रिया गृहात उपचार झाले त्यानंतर दोन दिवसांनी व्हेंटीलेटर काढण्यात आले. सदर रुग्ण महिलेचा हृदयालयातील उपचारामुळे पुनर्जन्मच झाला. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णावर उपचार झाले असून पाचव्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको
हृदयविकाराचा झटका येण्यासाठी वयाची बंधने राहिली नसून छातीच्या दुखण्याकडे आता दुर्लक्ष करायला नको. ह्या रुग्णाकडे अगदी कमी वेळ शिल्लक होता, शस्त्रक्रिया करणे खूप मोठे आव्हान होते, मात्र अत्याधुनिक कॅथलॅब, आमची उत्तम प्रशिक्षीत टिम आणि नातेवाईकांचा विश्वास या सर्व गोष्टी एकत्रित जुळून येत रुग्ण व्हेंटीलेटरवरुन सुखरुप परत आल्याचे डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील व डॉ.सुमित शेजोळ यांनी सांगितले.
डॉक्टरांचे खुप खुप आभार
माझ्या पत्नीची प्रकृती अत्यंत क्रिटीकल झाली होती. अखेरचे काही मिनीटच तिच्याकडे उरले होते. डॉक्टरांनी सांगितले १०० टक्के प्रयत्न करु आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले. आज माझी पत्नी मेजर हार्टअटॅकच्या धक्क्यातून सुखरुप बचावली. येथील सेवा खरोखरच वाखाण्याजोगी असून मी आभारी आहे.- श्री राजेंद्र, रुग्णाचे पती