रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू असताना आता बँकेतील एका कर्मचार्याच्या डोळ्यात तिखट फेकून रस्त्यात त्याच्याजवळ असलेल्या ६७ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी बळजबरीने हिसकवल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.
याबाबत वृत्त असे की, बचत गटेचा बँक कर्मचारी आकाश अनिल पाटील (रा.जूना सावदा रोड, रावेर) हे ८ रोजी अटवाडे येथून वसूलीचे पैसे घेऊन मोरगाव मार्गे रावेरच्या दिशेने येत होते. मोरगावच्या नजिक रस्त्यात पुला जवळ त्यांना दोन अज्ञात चोरट्यांनी अडवत त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. यानंतर त्यांच्या जवळील ६७ हजार १४३ रुपये रोकड बळजबरीने हिसकवून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे व पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आकाश अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.