शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेंदुर्णी नगरपंचायततर्फे महानुभाव पंथ स्मशानभूमी परिसरात देशी प्रजातींची वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी नगराध्यक्षा विजया खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सर्व सन्माननीय नगरसेवक, समाजसेवक अमृत खलसे, गोविंद अग्रवाल व नपा कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतुचक्र यांवर उपाय करण्यासाठी राज्य सरकारने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे.वृक्ष ही निसर्गचक्र दाखवितात, त्यामुळे वृक्षांची जपणूक झाली पाहिजे. मात्र सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती महत्त्वाची असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्षा विजया खलसे यांनी केले.
‘वृक्ष, जल व मृदु संधारणाचे महत्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे.प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. मानवी जीवन व सजीव सृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका वृक्षांची असल्याने आपण सर्वांनी झाडे लावणे व वाढवणे आवश्यक आहे. जल, जमीन आणि जीवन यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.