जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कठोरा शिवारात असलेल्या शेतातील वहीवाटीच्या रस्त्यावरून केळीने भरलेले ट्रकचा लाकडाला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन भावांना चौघांकडून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कठोरा येथे रहिवाशी ज्ञानेश्वर मधुकर सुर्यवंशी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे कठोरा शिवारातील शेत गट नंबर ४२ मध्ये शेत आहे. सोमवारी २२ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून केळीने भरलेला ट्रक हा शेत रस्त्यावरून जात असतांना हेमराज प्रल्हाद सपकाळे यांच्या लाकडाला ट्रकचा धक्का लागल्याने हेमराज प्रल्हाद सपकाळे, अरूण प्रल्हाद सपकाळे, नितीन नरेंद्र सपकाळे आणि मयुर नरेंद्र सपकाळे सर्व रा. कठोरा ता.जि. जळगाव या चौघांनी ज्ञानेश्वर मधुकर सुर्यवंशी, प्रमोद मधुकर सुर्यवंशी या दोन भावांना लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता हेमराज प्रल्हाद सपकाळे, अरूण प्रल्हाद सपकाळे, नितीन नरेंद्र सपकाळे आणि मयुर नरेंद्र सपकाळे या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.