जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात वाढदिवसाचा केक कापण्यावरून झालेल्या वादात काहीजणांनी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचे घटना बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरापर्यंत तोडफोड करणाऱ्या संशयीतांना धरपकड करण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी हद्दीतील तुकारामवाडी परिसरात असलेल्या सम्राट कॉलनी परिसरामध्ये बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास काही जणांनी वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमांमध्ये काहीजणांनी वाद घालून दहशत निर्माण केली होती. या वादाचे रूपांतर हाणामारी झाल्यानंतर काही टवाळखोर तरुणांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशिरापर्यंत संशयीतांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. या घटनेबाबत पोलिसात अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.