जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जुन्या वादातून गोळीबार प्रकरणात अटक असलेल्या गुन्हेगाराने पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात शुक्रवार २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदी रा. गणेशवाडी, पांडे चौक, जळगाव असे गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदी याने धुचकीवर येऊन हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणात जळगाव तालुका पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी अटक केल्यानंतर सायंकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात त्याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली, यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलीस नाईक ईश्वर दोधू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.