मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांसोबत ना. गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण हे देखील आज अयोध्येला रवाना झाले आहेत.
गेल्या वर्षाच्या मध्यावर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाऊन श्री रामललांचे दर्शन घेण्याचा मानस व्यक्त केला होता. या अनुषंगाने ते उद्या अयोध्येत पूजा करणार आहेत. ते आज सायंकाळीच अयोध्या येथे पोहचत आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार देखील आहेत. आज एका विशेष विमानाने ही मंडळी अयोध्येकडे निघाली आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्यांसोबत राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन आणि चाळीसगावचे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील त्यांच्याच विमानातून अयोध्येकडे रवाना झाले आहेत. आमदार मंगेश चव्हाण हे राज्यातील सत्तांतरामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे दिसून आले होते. यानंतर त्यांची राज्यातील सत्तेच्या वर्तुळात मजबूत पकड झाली असतांनाच जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मोठे पद देखील आलेले आहे. या पार्श्वभूमिवर, आज अयोध्येच्या दौर्यावर ते देखील शिवसेनेच्या सोबत जात असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.