जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथे व्यापारी तरुणाची चारचाकी गाडी खरेदी विक्रीच्या व्यवहारात तब्बल ६ लाख रुपयांत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी सोमवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश चव्हाण हे नशिराबाद शहरात राहतात ते व्यापारी आहे. गणेश चव्हाण यांची एम.एच. २० सी टी ६९६४ या क्रमांकाची चारचाकी विक्री करावयाची आहे, यासंदर्भात एरंडोल शहरातील पपिंदरसिंग सरबनसिंग सैन ऊर्फ मनी रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल यांनी चव्हाण यांचा विश्वास संपादन करत त्यांची चारचाकी खरेदी करावयाचे सांगितले, या व्यवहारापोटी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पपिंदरसिंग यांनी चव्हाण यांना २० हजार रुपये बयाणा म्हणून दिले, उर्वरीत पाच लाख ८० हजार रुपये दोन महिन्यात देतो, असे खरेदी करारनामा करुन दिला, व गाडी ताब्यात घेतली, मात्र उर्वरीत पैसे पपिंदरसिंग यांनी मुदतीत दिले नाही, याबाबत चव्हाण यांनी वेळावेळी पैशांची मागणी केली, मात्र आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर गणेश चव्हाण यांनी सोमवार, २१ मार्च रोजी नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन पपिंदरसिंग सरबनसिंग सैन ऊर्फ मनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे हे करीत आहेत.