जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्न समारंभ आटोपून दुचाकीने जळगावला येत असताना नशिराबाद गावाजवळ चक्कर येऊन खाली पडल्याने जखमी झालेल्या ६२ वर्षे वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत सोमवार १३ मार्च रोजी रोजी रात्री उशीरा नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुमती गंभीर तेलंगे (वय-६२) रा. जोशीवाडा, मेहरून, जळगाव असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातील जोशीवाडा येथे सुमती तेलंगे ह्या आपले परिवारासह वास्तव्याला होत्या. २ जानेवारी रोजी रावेर तालुक्यातील सावदा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी त्यांच्या भावासोबत दुचाकीने गेलेल्या होत्या. दरम्यान लग्न समारंभ आटोपूर त्या पुन्हा भावासोबत जळगावकडे येण्यासाठी दुचाकीने निघाल्या. नशिराबाद हद्दीतील साकेगाव पुलाजवळ त्यांना दुचाकीवर चक्कर आला. दुचाकीवर बसलेल्या असतांना त्यांचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच असलेल्या गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. अखेर १८ फेब्रुवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिन्याभरानंतर सोमवार १३ मार्च रोजी रात्री उशिरा घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल युनूस शेख करीत आहे.