जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल तालुक्यातील उत्राण गावातून रविवारी २६ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी कासोदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भिकन रमेश कोळी रा. उत्राण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील उत्राण गावातील जी.के. फिटनेस क्लब येथे संशयित आरोपी भिकन कोळी हा बेकायदेशीर पणे सोबत तलवार ठेवून नागरीकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईसाठी एरंडोल तालुक्यातील उत्राण गावात रवाना केले. पथकातील पोलीस उपनिरीक्ष रमेश देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, पो.ना. नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोकॉ. ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी भिकन रमेश कोळी रा. उत्राण ता. एरंडोल याला अटक केली. त्यांच्याकडून तलवार हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी कासोदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.