भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसराच्या आवारातून जप्त केलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महसूल पथकाने कारवाई करत वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या जप्त करून पार्किंगला लावल्या होत्या. दरम्यान १३ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री संशयित आरोपी समाधान गुलाब महाले आणि सागर रवींद्र ह्याळींगे दोन्ही रा. भडगाव ता. भडगाव यांनी विना क्रमांकाच्या जप्त केलेल्या वाळूने भरलेल्या दोन्हीही ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या शासकीय दंड न भरता चोरून घेऊन गेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी विकास देविदास राठोड यांनी भडगाव पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता समाधान गुलाब महाले आणि सागर रवींद्र ह्याळींगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वाबळे करीत आहे.