जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल मुरली मनोहरजवळ रिक्षा अंगावर येत असल्याच्या कारणावरून दोन गटात लाकडी दांडा, लोखंडी पाईप आणि फायटरचा वापर करत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही गटातील चार जण जखमी झाले तर रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता परस्परविरोधात एकुण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल मुरली मनोहरजवळ मुदशीर शेख समील रा. तांबापूरा, जळगाव हा बुधवार १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ जाहीद शेख, जाकीर काल्या व अनोळखी एकजण असे चौघेजण जळगाव शहराकडे दुचाकीने जात असतांना समोरून आईस्क्रिमची रिक्षा येत होती. रिक्षा ही मुदशीर शेख सलीम यांच्या आंगावर येत असल्याचे पाहून दुचाकी बाजूला केली आणि रिक्षा संभाळून चालव असे म्हणाला. याचा राग आल्याने मनोज साळुंखे, जयंत अरूण वाणी, लोकेश जयंत वाणी यांनी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातील दोन्ही गटातील तरूणांनी हातात लाकडी दांडा, लोखंडी पाईप व फायटरचा वापर करून एकमेकांमध्ये तुफाण हाणामारी झाली. तसेच रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केले. या हाणामारीत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून मुदशीर शेख सलीम, जाहीद शेख सलीम, जाकीर काल्या, एक अनोळखी तरूण सर्व रा. तांबापूरा, जळगाव, मनोज साळुंखे, लोकश जयंत वाणी, जयंत अरूण वाणी तिघे राहणार कासमवाडी जळगाव अशा एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे करीत आहे.