नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेस पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिल्याचा गंभीर आरोप करत आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून अपक्षच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका आज आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय संपादन केल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यात त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करतांना पुढील वाटचालीचे सूतोवाच देखील केले. या पत्रकार परिषदेत तांबे म्हणाले की, आमचं कुटुंब सुरुवातीपासून कॉंग्रेस पक्षात आहे. युवक कॉंग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे.
तांबे पुढे म्हणाले की, मला ९ जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं पदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर ११ तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वांच्या मदतीने आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून भविष्यात देखील अपक्षच राहणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.