अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दूध शिल्लक नाही असे सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दंडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिथुन शांतीलाल सोनवणे (वय-३०) रा. भिलाटी भाग, पिंपळे रोड, अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गुरांच्या गोठ्यात साफसफाई करत असताना त्या ठिकाणी किरण दगा भिल रा. भिलाटी भाग, अमळनेर हा तिथे आला. त्यावेळी मिथुन सोनवणे यांनी सांगितले की, काल दूध शिल्लक नव्हते, मालक आल्यावर तुम्ही त्यांना भेटून दूध घेऊन जा, असे सांगितल्याच्या रागातून किरण भिल याने मिथुन सोनवणे याला बेदम मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर हातावर पायावर मारून गंभीर दुखापत केले तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेला मिथुन सोनवणे हा अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. या संदर्भात दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून किरण दगा भिल रा. पिंपळे रोड, अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.