जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित १०८ सूर्यनमस्कार साधना वर्गाच्या समारोप कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत शनिवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सूर्यनमस्काराच्या साधनेने शारीरिक लवचिकता तर वाढेतच मात्र एकाग्रता आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ होऊन जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. आयुर्वेद आणि योगा ही भारतीय संस्कृतीची देण आहे. आयुर्वेदातील वनस्पती या नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तर योगा त्यास पुरक म्हणून काम करतात. सूर्यनमस्काराच्या साधनेने शारीरिक लवचिकता वाढून व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम होतात. विद्यार्थीदशेत जाणवणा-या ताणतणावाचे व्यवस्थापन करणे त्यांना सुलभ होईल असे ते म्हणाले.
विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १८ ते २८ जानेवारी या कालावधीत सूर्यनमस्कार साधना वर्ग घेण्यात आले. रथसप्तमीच्या दिवशी शनिवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता या वर्गाचा समारोप झाला. या केंद्राचे प्रमुख अभियंता राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. राजू आमले, आसमा तडवी, ललित गिरासे, या शिबिरार्थीनी मनोगत व्यक्त केले. डॉ. लीना चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत गरूड, अश्विन सोनवणे, भगवान साळुंखे, रत्नाकर सोनार यांनी परीश्रम घेतले.