पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पुनगाव रोडवरील आशिर्वाद रेसिडेन्सीमध्ये राहणार्या निलीमा अशोक पाटील यांच्या मृत्यू प्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासर्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शिंदाड ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या निलिमा अशोक पाटील (वय – ३०) हिचा दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास शहरातील राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ग्रामीण रुग्णालयात निलिमा हिचा मृतदेह बघताच माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश केला होता. निलिमा यांना गेल्या दोन वर्षांपासून पती, सासु व सासरे हे शारिरीक व मानसिक छळ करत होते. असा आरोप मयत निलिमा पाटील हिचा भाऊ दिनेश पाटील यांनी केल्याने २१ जानेवारी रोजी पती, सासु, सासरे या तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
निलिमा साहेबराव पाटील हिचा विवाह सन – २००८ मध्ये गावातीलच अशोक श्रीराम पाटील यांचेशी झाला होता. लग्नानंतर चांगली वागणुक मिळाल्यानंतर निलिमा हिचा सासरच्या मंडळींकडुन शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला. दरम्यान निलिमा हिच्या आई, वडिल, काका व भावाने तिची समजुत काढत सर्व काही व्यवस्थित होईल असा धीर दिला. आई, वडिल, काका व भाऊ यांचा सल्ला ऐकुन निलिमा ही त्रास सहन करत राहिली. सततच्या होणार्या त्रासाला कंटाळूनच निलिमा हिने आत्महत्या केली आहे. अशी तक्रार मयत निलिमा हिचा भाऊ दिनेश साहेबराव पाटील यांनी पोलिसांना दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून २१ जानेवारी रोजी अशोक श्रीराम पाटील (पती), श्रीराम राजाराम पाटील (सासरे) व विजयाबाई श्रीराम पाटील (सासु) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे. मयत निलिमा हिला १४ वर्षाचा एक मुलगा आहे.