जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आव्हाणे, खेडी शिवारात कृषी पंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून पुर्वसुचना न देता खंडीत करण्यात आला आहे. रब्बी हंगाम सुरू असतांना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने तातडीने वीज जोडणी करावी अशी मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दीक्षित वाडी येथे महावितरण कार्यलयात मुख्य कार्यकारी अभियंता यांना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी शेत शिवारातील असलेल्या शेतकर्यांच्या शेतातील वीज पुरवठा महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून खंडित केला आहे. महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना कुठलीही माहिती व पूर्वकल्पना दिलेली नाही. कृषी पंपाचे वीज बिल भरावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान रब्बीचा संपूर्ण हंगाम पेरला गेला आहे. केळी, मका, हरभरा व गहू या पिकाला तत्काळ पाण्याची आवश्यकता असल्याने वीजपुरवठा सुरळीत करावा. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे, अशा परिस्थितीत संपूर्ण शेतकऱ्या आस आता रब्बी पिकावर आहे. अशा परिस्थितीत कृषी पंपांना वीज पुरवली न गेल्यास रब्बीची पिके देखील वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी पंपांना वीज जोडणी तातडीने करून द्यावी, असे मागणीचे निवेदन मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सांयंकाळी ५ वाजता जळगाव तालुक्यातील आव्हाणे व खेडी परिसरातील शेतकऱ्यांनी अयोध्या नगरातील महावितरण कंपनीला देण्यात आले आहे. या निवेदनावर ॲड. हर्षल चौधरी, भानुदास चौधरी, सुभाष चौधरी, सुखदेव पाटील, राहुल मोरे, योगेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी यांच्या स्वाक्षर्या आहेत.