जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कधीकाळी महाराष्ट्र भाजपाचे आधारवड आ. एकनाथराव खडसे यांच्याबद्दल काही दिवसांपासून नको त्या वावटळ्या उठवण्याचे काम भाजपाकडून सातत्याने होत आहे. काहीही आधार नसलेल्या बातम्या समाजात पेरून खुद्द आ.खडसेंना बदनाम करण्याचे,त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केला आहे.
आ. एकनाथराव खडसे यांचे विश्वासू तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आ. खडसे यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रसिधीपत्रात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दमदार कामगिरीला कुठेतरी लगाम लागेल. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होईल. त्यांच्यामध्ये संभ्रम तयार करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला पोषक वातावरण तयार होऊन फायदा होईल. मात्र कितीही काही झाले तरी ज्या भाजपाने नाथाभाऊंची गेल्या ४० वर्षाची अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द कूटनीतीने संपवण्याचा घाट रचला,त्या भाजपासोबत नाथाभाऊंची समेट यापुढे कधीही शक्य नाही. आमदार खडसेंबद्दल भाजपाकडून सुरु असलेल्या या घाणेरड्या राजकारणाविषयी त्यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकतेच मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन गेले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या जाहीर सभेचे आयोजन मुक्ताईनगर येथे करण्यात आले होते. यावेळी आ. पाटील यांनी ते दिल्ली वाऱ्या का करीत आहेत? अमित शाह यांना का भेटत आहेत? असे असे प्रश्न उपस्थित केले होते. याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी मदत केल्यामुळेच चंद्रकांत पाटील आमदार होऊ शकल्याचा गौप्यस्फोट करून भाजपाचे पितळ उघडे पडले होते. गेल्या निवडणुकीत स्व- पक्षाशी गद्दारी करून भाजपाचीच शीट पाडण्याचं महापाप मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. मुळातच ज्या व्यक्तीने आयुष्यभर भाजपाची इमाने ईदबारे तिकीट वाटपाचे काम केले, त्याच आमदार खडसेंना तिकीट नाकारून भाजपाने त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या सौ रोहिणी ताई खडसे यांना ऐनवेळी भाजपाचे तिकीट डिक्लेअर करून त्यांचा पराभव कसा करता येईल याची रणनीती भाजपाने आखली. जे जे या रणनीतीमध्ये सहभागी होते. ते सर्व गद्दार भाजपायी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर बसलेले होते…. असे स्वतः आमदार एकनाथराव खडसेंनी स्पष्ट केले आहे.