मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची तर उपनेतेपदी आमदार चिमणराव पाटील यांची शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री आपल्या गटातर्फे विविध महत्वाच्या नियुक्त्या केल्या. यात चार मान्यवरांची नेतेपदी तर २६ जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत खासदार भावना गवळी, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, यासोबत उपनेतेपदांच्या नियुक्तीत जळगाव जिल्ह्यातून पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित उपनेत्यांमध्ये अनिल बाबर,दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया,श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक,संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत,सदा सरवणकर,राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांचा समावेश आहे.