पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खु येथील सुनील पाटील यांचा एकुलता एक अकरा वर्षांचा मुलगा वैभव याचा बुधवार, ७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात न्यूमोनियाने दुःखद मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खु” येथील शेतकरी सुनिल सुभाष पाटील यांच्या एकुलत्या एक वैभव या मुलाला सुमारे वीस दिवसांपूर्वी सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसू लागली होती. ही लक्षणे जाणवताच त्यांच्या कुटुंबियांनी त्याला अगोदर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील दवाखान्यात पाठविण्याचा सल्ला दिला. काही दिवस घरीच व नंतर पाचोरा व जळगाव उपचार करुन घेत असतांनाच त्याला न्युमोनिया झाला असून परिस्थिती गंभीर असल्याकारणाने त्याला जळगाव येथून औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु पाचोरा, जळगाव ते औरंगाबाद असा उपचारासाठीच्या प्रवासात वीस दिवस निघून गेले होते. व यातच न्युमोनियाच्या आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने उपचाराच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता वैभवाची प्राणज्योत मालवली. वैभवच्या निधनाची वार्ता कुऱ्हाड गावात माहीत पडताच कुऱ्हाड गावातील ग्रामस्थांनी वैभवाच्या घराजवळ एकच गर्दी केली होती. वैभव हा हसमुख, हजरजबाबी, हुशार व सगळ्यांचे काम ऐकणारा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावावर एकाच शोककळा पसरली व गावात स्मशानशांतता पसरली होती. वैभववर दि. ७ रोजी सायंकाळी शोकमय वातावरणात कुऱ्हाड या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.