चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोल लागले असून वाजंत्री बंद करण्यावरून पोलिसांनी लाठीमार केल्याचे वृत्त आहे.
चोपडा तालुक्यात पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन करण्यात येते. यानुसार, शहरासह तालुक्यातील श्रीगणेशाचा रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात आले. या अनुषंगाने चोपडा तालुक्यातील धानोरा येथे देखील विसर्जन मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीत सहायक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी गावातील पाच तरूणांना किरकोळ कारणावरून गाडीत बसवून ठेवल्याने ग्रामस्थ नाराज झाले.
यानंतर रात्री दहाच्या सुमारास किरण दांडगे यांनी मंडळांना वाजंत्री बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यात काही जणांनी दगडफेक सुरू केल्याने काही वेळ धावपळ उडाली. यात पोलिसांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशीरापर्यंत हा वाद सुरू होता. या प्रकरणी पोलीसात तक्रार नोंविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी काही वेळेतच स्थिती नियंत्रणात आणली आहे.