यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी नागरीकांची वडीलोपार्जित चालत आलेली नवाई सणाची रूढी परंपरा आजच्या युगात ही आदीवासी समाज बांधवांनी सुरू ठेवली आहे. तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मनापुरी या आदिवासी वस्तीवर हा महोत्सव मोठया उत्साहाने साजरा झाला.
ज्याप्रमाणे खान्देशातील शेतकरी राजा पोळ्याच्या दिवशी आपल्या सर्जा राजाला पुरणपोळी व खरीप हंगामातील लागवड केलेली उडीद मूग ज्वारी गहू हरभरा बाजरी इ.धान्यांचे भरड (धान) खाऊ घालत नाही तोपर्यंत मालधनी शेतकरीही या धान्याचा स्वतःच्या खाण्यात वापर करीत नाही. अशी रूढी परंपरा काही शेतकरींनी आजही सुरू ठेवली आहे. अशीच एक पारंपारिक रुढी परंपरा आदिवासी पावरा समाजात ही सुरू आहे.
खान्देशातील पोळा सण संपला की दुसऱ्या दिवसापासून आदिवासी बांधवांचा नवाई हा महोत्सव सुरु होतो. नवाई या महोत्सवाच्या दिवशी संपूर्ण आदिवासी बांधव आपल्या घराची साफसफाई करतात. गायीच्या शेणाने अंगणे सारवून घरासमोर रांगोळी करतात. या महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात पेरणी केलेली कडधान्ये आपले कुलदैवत गिरोहिन मातेला नैवद्य दाखवल्या शिवाय खात नाही.
यादिवशी गिरोहिन मातेला सर्व शेतात पिकलेल्या मका ज्वारी व इतर कडधान्यांसह काकडी,खिरे इ. सर्व वस्तूंची पुजारा मार्फत पुजा करुन गिरोहिन मातेला नैवदय दाखविला जातो.व सर्व आदिवासी बांधव नवपोशाख घालून आदिवासी नृत्यावर नाच व कला सादर करून दिवसभर हा महोत्सव साजरा करतात.
शेतात पिकणाऱ्या प्रत्येक धान्यांची पुजा केल्याशिवाय आदिवासी बांधव कोणतेही कडधान्य खात नाही. ही रूढी परंपरा वर्षानुवर्षे सुरू असून आजही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले समाज बांधवांनी वडीलोपार्जित परंपरा उत्साहात सुरू ठेवली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांवर हा महोत्सव शेतीचा खरीप पिकांचा हंगाम आल्यावर साजरा केला जाणार असल्याची माहिती मनापुरी येथील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते डॉ.आकाश पावरा यांनी दिली.