फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत धनाजी नाना महाविद्यालयात शहीद स्मारक सायकल यात्रा (रॅली) काढण्यात आली.
विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद स्मारक सायकल यात्रा (रॅली) चे आज गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. रॅलीत सहभागींना डॉ. उमेश पिंपळे’ यांच्या सौजन्याने मोफत टी शर्ट देण्यात आले. रॅली धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रेरणा स्तंभ येथून सावदा मार्गे कोचुर, रोझोदा, खिरोदा, कळमोदा, न्हावी, कारखाना मार्गे म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर असे २० ते २१ किलोमिटर काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
८५ स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिमांचे पूजन
रॅली दरम्यान प्रत्येक गावांत शहीद जवानांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कोचुर येथे मुख्य चौकात, रोझोदा येथे शहीद जवान जितेंद्र कोल्हे यांच्या स्मारकास, तसेच रोझोदा येथील शहीद चौकात, खिरोदा येथील धनाजी नाना शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील गांधी स्मारक व खिरोदा गावातील गांधी पुतळा येथे, जिल्हा परिषद शाळा खिरोदा येथे, कळमोदा येथील विठ्ठल मंदिरात, न्हावी येथील ग्रामपंचायत कार्यालयात, फैजपूर येथील नगरपालिका शाळेत अशा विविध ठिकाणी जवळपास ८५ स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या शौर्य गाथा सांगून, शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, घोषणा देत देश भक्ती गीते गवून, इतिहासातील शुर वीरांचा गौरव करण्यात आला.
गावागावात रॅलीचे स्वागत
दरम्यान, प्रत्येक गावात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, माजी सैनिक,ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. प्रत्येक गावात गावकऱ्यांनी विविध खा्यपदार्थ वाटप करून रॅलीचे स्वागत केले. रॅलीची सांगता धनाजी नाना महाविद्यालयातील प्रेरणा स्तंभ येथे करण्यात आली.
रॅलीस धनंजय चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
सकाळी आठ वाजता युवा नेते धनंजय चौधरी यांच्या हस्ते थोर नेते धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे पदाधिकारी के. आर. चौधरी, एम. टी. फिरके, माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील,औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग, सावदा येथील सुश्रुत अक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. उमेश पिंपळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. डॉ. जी. जी. कोल्हे, शहीद स्मारक यात्रा समितीचे चेअरमन डॉ. एस. व्ही. जाधव, सर्व उपप्राचार्य डॉ. ए. आय भंगाळे, प्रा. ए. जी. सरोदे, प्रा. डी. बी. तायडे, रॅली समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.