
पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शेवाळे येथे रक्षाबंधनानिमित्त आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवाळे ता. पाचोरा येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक कन्या उमा नानू फादगे (वय – २०) हिचा विवाह खंडेराव नगर, जळगांव येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांचेशी शेवाळे ता. पाचोरा येथे दि. १८ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात पार पडला. लग्नानंतर उमा ही वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. दरम्यान रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणुन दि. १२ आॅगस्ट २०२२ रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले होते.
याच दिवशी रात्री उमा ही गावात वास्तव्यास असलेली तिची मावशी शिलाबाई सोमनाथ गायकवाड यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. दि. १३ आॅगस्ट रोजी उमा आपल्या घरी आल्यानंतर मला आंघोळीसाठी जायचे आहे असे सांगुन घरातील स्नानगृहाकडे गेली. दरम्यान बराच वेळ होवुन सुद्धा उमा येत नसल्याने वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत वडिलांना आढळुन येताच वडिल नानू फादगे यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने उमा हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी उमा हिस मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? यांचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
मयत उमा हिचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राकेश खोंडे हे करित आहे.


