जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “ज्योतिषावर विश्वास न ठेवता आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कविता निरीक्षणातून आलेल्या आणि समाजाभिमुख होत्या, त्यामुळे त्यांच्या नावाचे हे विद्यापीठ भविष्यात निश्चित मोठी प्रगती करेल.” असा विश्वास माजी कुलगुरु प्रा.आर.एस.माळी यांनी व्यक्त केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चौथ्या नामविस्तार दिनानिमित्त गुरुवार, दि.११ ऑगस्ट रोजी विद्यापीठात आयेाजित कार्यक्रमात प्रा.माळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी होते तर सन्माननीय अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.विजय खोले व मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.आर.डी.कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार उपस्थित होते.
प्रा.माळी यावेळी म्हणाले की, “बहिणाबाई चौधरी यांना जणू दैव शक्ती प्राप्त झालेली होती. त्यांच्या कविता या आशावादी होत्या. जीवनात अपयश आले तरी निराश न होता मार्ग शोधा. यशाचे शिखर गाठता येईल. असा आशावाद व्यक्त करणाऱ्या होत्या. या मातीशी निगडीत अशा त्यांच्या कविता होत्या. बहिणाबाईंचे नाव दिल्यामुळे या विद्यापीठाचा नावलौकीक उंचावला असून विद्यापीठाच्या प्रगतीत सर्व घटकांचे मोठे योगदान आहे. प्रथम कुलगुरु प्रा. एन.के.ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून या विद्यापीठाला आकार प्राप्त झालेला आहे. नैसर्गिक ढाच्याला हात न लावता विद्यापीठाच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. कमी कालावधीत विद्यापीठाने प्रगती केली आहे. मात्र देशाच्या पातळीवर संशोधन वाढीला लागणे गरजेचे आहे. नॅकचे निकष बदलले आहेत. परीक्षेचा निकाल संशोधन, प्लेसमेंट या निकषात लक्षात घेतले जातात. नॅक मुल्यांकनात या विद्यापीठाला चांगली ग्रेड मिळेल. यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे असे आवाहन प्रा. माळी यांनी केले. प्रा.विजय खोले यांनी देखील प्रथम कुलगुरु प्रा.ठाकरे यांनी प्रशाळा पध्दत महाराष्ट्रात या विद्यापीठात स्वीकारुन आदर्श निर्माण केला. ही पध्दत पुढे इतर विद्यापीठांनी स्वीकारली. ठाकरे यांच्या काळात विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही शैक्षणिक व प्रशासकीय घडी प्रभावीपणे राबविली. त्यानंतर या विद्यापीठाने मोठी प्रगती केली असे प्रा.खोले म्हणाले. प्रा.आर.डी.कुलकर्णी यांनी निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईंनी अक्षरसाहित्य निर्माण केले.” असे सांगून त्यांच्या एकेक कविता प्रबंधाचा विषय आहे असे मत मांडले.
व्य.प.सदस्य दिलीप पाटील यांनी, “कोणताही संघर्ष न होता या विद्यापीठाचा नामविस्तार झाला हा या खान्देशच्या मातीचा गुण असून हे विद्यापीठ समाजाभिमुख काम करीत आहे. अनेक योजना त्यासाठी राबविल्या जात आहेत. बहिणाबाई चौधरी यांच्या नावे पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात नवउद्योजक निर्माण करावयाचे आहेत.” असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांनी, “नामविस्तार ही घटना विद्यापीठाच्या इतिहास नोंद घेणारी घटना आहे. बहिणाबाईंच्या कविता खान्देशातील सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक जीवनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आहेत. त्यामुळे हा नामविस्तार या प्रदेशातील अस्मितेशी जोडणारा आहे. बहिणाबाईंच्या कवितांमधून जीवनाची दिशा मिळते.” असे सांगून प्रा.माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती दिली. विद्यापीठातील श्रमसंस्कृतीच्या बळावर नॅक मानांकन चांगले मिळेल असा विश्वास प्रा.माहेश्वरी यांनी बोलून दाखविला.
या समारंभात विद्यापीठाच्या नूतन संकेतस्थळाचे लोकार्पण प्रा.माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी केले. संगिता सामुद्रे यांनी बहिणाबाईंचे गीत सादर केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले.