यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील चित्र मंदीरात जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी बांधवाना मार्गदर्शन केले.
प्रसंगी व्यासपीठावर आ. शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, शेखर पाटील, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम.बी.तडवी, प्रकल्पस्तरीय समितीच्या माजी अध्यक्ष मीना तडवी, तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी मनोज म्हसे, राजू तडवी, अॅड. राजीव तडवी, दिलरुबाब तडवी, प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, शिवसेनेचे हुसैन तडवी, मासूम तडवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून आमदार शिरीष चौधरी व प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याहस्ते हिरवा झेंडे दाखवुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदीवासी विद्यार्थी व विद्यार्थिनीसह विविध आदीवासी संघटनाच्या वतीने पारंपारीक वेशभुषेत सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमात प्रास्तविक प्रकल्प अधिकारी वीनिता सोनवणे केले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, एम.बी.तडवी यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमात गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील व विनोद ढगे यांनी केले.