धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी तालुक्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यात ते निकटवर्तीयांशी संवाद साधत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास प्रारंभ झालेला आहे. यात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. या अनुषंगाने आता प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी देखील चाचपणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच गुलाबराव देवकर यांनी नगरपालिका निवडणुकीबाबत बैठक घेतली होती. यानंतर चांदसर, कवठळ, आव्हाणी, चोरगार, धार, शेरी, सोनवद, चमगाव या गावांना त्यांनी भेटी दिल्या. यात समर्थकांच्या गाठीभेटींसह द्वारदर्शनादींसाठी त्यांनी भेटी दिल्या. आगामी निवडणुकींआधी त्यांनी आपल्या निकटवर्तीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला.