मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईच्या भौगोलिक स्थितीबाबत भाष्य केले असावे असा अंदाज व्यक्त करत ते एक सरळ, सज्जन व्यक्तीमत्व असल्याचे कौतुकोदगार आमदार रवी राणा यांनी काढले आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाच्या केलेल्या अपमानाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. यावरून कोश्यारी यांनी आपला असे म्हणण्याचा हेतू नव्हता असे सांगून सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून आता सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. तर काही नेते त्यांची पाठराखण करतांना दिसून येत आहेत. यात बडनेरा येथील भाजपला समर्थन देणारे अपक्ष आमदार रवी राणा हे समोर आले आहेत.
सध्या सुरू असलेल्या वादावर रवी राणा म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते भौगोलिक दृष्ट्या केलं असेल. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबई हे देशातील सर्वात हायटेक शहर आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची सुरूवात गिरणी कामगारांपासून झाली होती. मात्र, त्यानंतर तिथे अनेक व्यापारी आणि जाती-धर्माचे लोक आलेत. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वांचा हातभार आहे. मुंबई ही सर्वांची आहे, असे आमदार राणा म्हणाले. आता त्यांच्या या वक्तव्यावरून देखील टीका होण्याची शक्यता आहे.