जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे. ९ जुलै, २०२२ पर्यंत विद्यापीठाने या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविलेले आहेत. सामाजिक क्षेत्रात रचनात्मक आणि समाजबांधणी करणारे कार्य आवश्यक असून वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक प्रबोधन वाढीस लागणारे कार्य असावे, सामाजिक क्षेत्रात केलेले हे कार्य समाजासाठी उन्नत करणारे व पथदर्शक असावे. पुरस्कारासाठीचे वय हे ४० वर्षापेक्षा कमी नसावे. तसेच १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्याक्षेत्रात त्या व्यक्तीचे काम असावे. संस्था असेल तर नोंदणीकृत संस्थेचे काम १५ वर्षांपेक्षा अधिक असावे. संस्थेचा तीन वर्षाचा ऑडीट रिपोर्ट जोडलेला असावा. असे पुरस्काराच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी कुलगुरूंच्या संमतीने निवड समिती गठीत केली जाईल. विशेष परिस्थितीत प्राप्त प्रस्तावांव्यतिरीक्त इतर योग्य पात्र व्यक्ती अथवा संस्थेचा विचार निवड समिती करू शकते. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना दिला असून सविस्तर नियमावली देखील देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह ९ जुलै, २०२२ पर्यंत अर्ज सादर करता येतील. पुरस्काराचे वितरण समारंभपुर्वक केले जाणार असून त्याची तारीख विद्यापीठाकडून कळविण्यात येईल. अशी माहिती प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांनी दिली.