मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर मतमोजणी खोळंबली असून यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती. यात भाजपतर्फे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूर येथील धनंजय महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल तर कॉंग्रेसतर्फे इम्रान प्रतापगडी यांना तिकिट मिळाले होते. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती.
आज सायंकाळी चार वाजता मतदान पूर्ण झाले. यानंतर तासाभरात निकाल अपेक्षीत होता. तथापि, भाजप आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. यामुळे निकालास विलंब झाला. या निवडणुकीत गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केला होता. यात जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. तर महाविकास आघाडीने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली.
यावरून राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र चौकशी करून नंतर चर्चा केली. तथान, रात्री साडेनऊ वाजेपर्यंत देखील कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.