बापरे : सख्ख्या पुतण्याने काकूला चिरडले !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अगदी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकूला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील शेळावे खुर्द येथे घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील शेळावे खुर्द येथे एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली असून यामुळे समाजमन अक्षरश: सुन्न झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळावे खुर्द येथील बापू सांगळे यांचे सख्खे भाऊ दत्तू सांगळे यांच्यासोबत गेल्या सुमारे सात वर्षांपासून वाद सुरू आहेत. या दोन्ही भावांची शेती लागून असून विहीरीवर पाणी भरण्याचा सामयिक अधिकार आहे. मात्र या दोन्ही भावांमध्ये बांधासह पाणी भरण्यावरून वाद सुरू आहेत.

शुक्रवार दिनांक १० जून रोजी सकाळी पाणी भरण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. यात अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत असतांना पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या. यानंतर दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे याने त्याच्या मालकीचे एमएच- १९, सीवाय- ८१८३ क्रमांकाचे छोटा हत्ती हे वाहन भरधाव वेगाने आपल्या काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर घातले. यामुळे अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुल उर्फ सोनू सांगळा याला पोलिसांनी अटक केली असून खुनाच्या कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि राजू जाधव करत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: