पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथील रेल्वे भुयारी मार्गाजवळील सुपडू भादू पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस साचलेल्या कचऱ्याला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.
दरम्यान तेथील स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळात अग्निशमन दल दाखल झाल्याने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलास यश आले. घटनास्थळा पासुन काहीच अंतरावर पाचोरा सेंट्रल मधील अद्ययावत असे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असुन या हाॅस्पिटलला अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर सह याच कॉम्प्लेक्समध्ये अनेक खाजगी बॅंका व दुकाने आहेत. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवित अथवा वित्त हानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे राजु पाटील, राजु कंडारे, भिकन गायकवाड, स्थानिक व्यावसायिक तथा मधुराज डिजीटलचे संचालक सुनिल सोनार, सतिष पाटील, समाधान मुळे, कुणाल मोरे, प्रविण मुळे यांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच या परिसरात नियमित कचरा गाडी येत नसल्याने हाॅस्पिटल व स्थानिक व्यावसायिक कचरा फेकण्यासाठी याच ओपन स्पेसचा वापर करतात. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देवुन या परिसरात नियमित कचरा गाडीची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांतर्फे करण्यात येत आहे.