जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव श्रावण सोळंके वय ४३ असे मयत मजुराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव श्रावण सोळंके (वय-४३) हे मजुरीकाम करुन त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. ९ एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या दुचाकीने धडक दिली होती. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता.
मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच बादल व सौरभ हे दोन मुले असा परिवार आहे. या अपघातप्रकरणी मयत नामदेव सोळंके यांचा मुलगा बादल सोळंके वय १९ याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, २५ एप्रिल रोजी दुचाकीस्वार सचिन दिनकर सावळे चुंचाळे ता. यावल याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणीक सपकाळे हे करीत आहेत.