जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या थकबाकीपोटी सिक्युटरायझेशन अंतर्गत कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा बँकेकडून करण्यात आली.
जिल्ह्यातील सुस्थितीत आणि प्राधान्यक्रमाने पूर्णपणे गाळप क्षमतेत सुरु असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून डबघाईला गेला होता. जिल्हा बँकेकडून करण्यात आलेला पतपुरवठा ५५ कोटी पर्यत थकबाकी देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाकडे कारखान्याची मालमत्ता तारण होती. हि थकबाकी वेळोवेळी मुदतवाढ देऊनही परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडून विहित मुदतीअखेर सिक्युटरायझेशन अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा बँक व्यवस्थापन मंडळाकडून सोमवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असून कारखान्यावर एम.टी.चौधरी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांनी दिली.