अक्षय तृतीया एका दिवसावर येऊन ठेपली, तरी सालगडी मिळेना; शेतकरी चिंताग्रस्त

Farmer 1

चोपडा (प्रतिनिधी) अक्षय तृतीयाचा सन जवळ आला की, शेतकऱ्यांचा शेतीकामासाठी सालदार शोधण्याची लगबग सुरू होते.अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवसापासून सालगडी हा कामावर रुजू होतो. मात्र यंदा सालगडी मिळणे अवघड झाले आहे. मिळालाच तर सालगडी ठेवण्याची हिंमत शेतकरी करीत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. एकंदरीत यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय.

 

 

गेल्या दोन-तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस नसल्याने पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय तृतीया सण जवळ आला की शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला ठेवावे याचा विचार करु लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी साल गड्याला वार्षीक रक्कम ३५ ते ५० हजारापर्यंत सहज दिले गेले होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता आखातीजचा सण जवळ येऊन ठेपला आहे, तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. यंदा साल गाड्याची वार्षिक रक्कम ऐकून शेतकरी थक्क होत आहेत. सालगडी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी निम्मबटाईने शेती करण्याच्या मानसिकतेत आहेत.

 

 

प्रथेप्रमाणे शेतकरी आखातीजच्या दोन-तीन दिवस अगोदर पासून सालगडी निवडतात पूर्वीचा सालगडी योग्य वाटल्यास त्याच्या वार्षीक रकमेत काही प्रमाणात वाढ करून त्यालाच पुन्हा ठेवले जाते.यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहीर व बोअरला काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे तर काही कोरड्या ठक्क झाल्या आहेत त्यामुळे शेती उत्पन्न कमी निघाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत सालगडी वर्षाची पगार ४० ते ७० हजार व चार पोते धांन्य मागत आहे. दिवसभर शेतात काम करणार पण रात्री शेतात मुक्कामी राहणार नाही. मालकांनी मोबाईलची सोय करून द्यावी ठरलेल्या रकमेची निम्मी रक्कम उचल म्हणून सुरवातीलाच द्यावी अशा मागण्या सालगडी मांडत आहेत. शेती अवजारे खते बी-बियाणे यांचे दर वाढत आहे अशा परिस्थितीत मोठा बागायतदार किंवा मोठे शेतकरी यांनाही सालदार लावून घेण्याचे अडचणीचे ठरत आहे तर अल्पभूधारक निम्मेंबटाई किंवा पैशाने शेती देण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

 

यंदा असलेली दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे वाढत चाललेली महागाई यामुळे यंदा शेतीतून अत्यंत कमी उत्पादन निघाले आहे. निघालेल्या मालास बाजारपेठेत भाव मिळाला नाही. काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळाला नाही त्यामुळे सालदाराचा पगार व चार पोती धान्य द्यावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.? सर्व्याच बाबतीत शेतकरी हवालदिल झालेला आहे.

Add Comment

Protected Content