जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व सीटूच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत व बिगर नोंदीत कामगारांचे प्रश्न सोडवण्यास संदर्भात यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी संघटनेच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळे सोमवारी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सहाय्यक कामगार आयुक्त व कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी व दलाल यांच्यामार्फत दीड हजार ते दोन हजार घेऊन सुरू असलेली अपात्र नोंदणी बंद करावी. पात्र बांधकाम कामगारांची नोंदणीकडे उद्दिष्टपुर्वक दुर्लक्ष केले जात असून कामगारांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, २०१८ पासून पात्र बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळाची थकित लाभ देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, नवीन नोंदणी ऑनलाइन दाखल केलेल्या कामगारांच्या नोंदणीस होत असलेल्या दिरंगाईचा चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर विजय पवार, प्रवीण चौधरी, हनीफ मुशीर शेख, अजीज खान, रमेश मिस्तरी, रऊफ शेख, फारुक शेख, समाधान भालेराव, मुक्तार शरीफ खान यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.