जिल्ह्यात सरासरी ५७.६० टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण; मोहिमेत महिलांचे प्रमाण समतोल

;जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्यासह जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७.६० टक्के नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. यात संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण सक्तीचे नसले तरी ७ लाख ९८ हजार ८५१ नागरिकांनी दुसऱ्या टप्प्यातील तर ७ लाख ४१ हजार ४४२ नागरिकांनी पहिल्या टप्प्यातील लस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. मात्र असे असले तरी लसीकरण मोहिमेत महिलांचे प्रमाण समतोल असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहीम पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लसींची कमतरता, केंद्रावरील गर्दी आणि पुरुष कामासाठी बाहेर जात असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले अशी कारणे समोर आली होती. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस एक वर्ष उलटून गेले तरी शहरांमध्ये अजूनही लसीकरणामध्ये महिलाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

७.४१ हजार नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

जिल्ह्यात आतापर्यत जिल्ह्यात सुमारे २० लाख ९२ हजार २०५ नागरिकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. तर २८ लाख ९१हजार ५६ (७९.५९ %) नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले असून ७ लाख ४१ हजार नागरिकांनी एकही लसीकरणाचा डोस घेतला नसल्याचेही समोर आले आहे. तसेच जिल्ह्यात ३ जानेवारी पासून १५ वर्ष वयोगटावरील किशोरवयीनांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यात सुमारे २,२५,८९८ किशोरवयीनांची संख्या असून आतापर्यंत १,२३,५१९ किशोरवयीनाचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे.

किशोरवयीन लसीकरणात जामनेर तालुका आघाडीवर

जामनेर तालुक्यात सर्वात जास्त ६२.१३ टक्के तर रावेर तालुक्यात सर्वात कमी ४५.१५ टक्के किशोरवयीन गटात लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात रावेर ४५.१५, यावल ४७.७२, जळगाव ५४.५४, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड ५७.७०, धरणगाव ५८.११ भडगाव ५९, अमळनेर ५९.५२, पाचोरा, चोपडा ६०.७१ टक्केच्या जवळपास लसीकरण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीत म्हटले आहे.

महिलांचा लसीकरणाचा टक्का वाढला

जिल्ह्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ऑगस्टपासून लसीकरण मात्रा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला. त्यानुसार खऱ्या अर्थाने लसीकरण मोहिमेस गती मिळून दर दिवशी दीड लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण लाभ देण्यात आलेला आहे. लसीकरणात महिलांचा लसीकरणाचा टक्का वाढला असल्याचेही दिसून येत आहे.

Protected Content