अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हाती लागली आहे.

खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी, 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली त्यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.

परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित एपीआय सचिन वाझे याच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती.

 

 

Protected Content