पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडीलांसोबत माहेरी जाण्यास देण्यास नकार देणाऱ्या सासू, सासरे व पतीला गुंगीकारक औषध देवून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहिता आणि तिच्या वडीलांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अर्जून उखा पाटील (वय-५२) रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा हे पत्नी विजयाबाई, मुलगा राहूल आणि सुन पल्लवी पाटील असे वास्तव्याला आहे. राहूलचे सासरे साहेबराव साडू म्हस्के रा. साबेलवाडी बदनापूर पो. खामगाव जिल्हा जालना हे मुलीला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पल्लवी हिने माहेरी जाते असे सांगितले. याला अर्जून पाटील, पती राहूल आणि सासू विजयाबाई यांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून विवाहिता पल्लवी आणि तिचे वडील साहेबराव म्हस्के यांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक औषध तिघांना न कळत पाजले. या गुंगीच्या औषधाने झोप लागली. याचा फायदा घेत पल्लवी व तिच्या वडीलानी लोखंडी गजाने तिघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अर्जून पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून सुन व व्याही यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून विवाहिता पल्लवी उर्फ कडूबाई राहूल पाटील रा. पाचोरा आणि साहेबराव साडू म्हस्के रा. खामगाव जि.जालना यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल मोरे करीत आहे.